बारामती : प्रतिनिधी
जमिनीची दुरुस्ती नोंद करण्यासाठी १० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या बारामती तालुक्यातील निंबुत येथील तलाठी मधुकर मारुती खोमणे (वय ५८) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.
वडीलांच्या नावे असलेल्या जमिनीची दुरुस्ती नोंद करण्यासाठी मधुकर खोमणे यांनी १० हजार रुपयांची मागणी केली होती. याबद्दल तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार आज निंबुतमधील तलाठी कार्यालयात तलाठी खोमणे याला १० हजारांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप कऱ्हाडे अधिक तपास करत आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.