
बारामती : प्रतिनिधी
राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. या निर्णयावर भाजपाने राज्य सरकारला लक्ष्य केले आहे. आता यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘विरोधामुळे वाईनचा निर्णय बदलल्यास मला वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही’ अशा शब्दात भूमिका स्पष्ट केली आहे.
बारामतीमधील गोविंदबाग या निवासस्थानी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.त्यावेळी त्यांनी सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री संदर्भातील निर्णयावर भूमिका स्पष्ट केली आहे. शरद पवार म्हणाले, वाईन आणि इतर जे काही आहे. त्यामधील फरक जाणून घेण्याची भूमिका घ्यायला हवी. ती भूमिका जाणून न घेता राज्य सरकारने यासंदर्भात वेगळा निर्णय घेतल्यास मला वाईट वाटण्याचे काही कारण नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाईन आणि दारू यामध्ये जमीन आसमानाचा फरक असल्याचे अगोदरच स्पष्ट केले आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
हा विषय फार चिंताजनक नाही. परंतु काही घटकांना हा विषय फारच चिंताजनक वाटत असेल तर; त्या संदर्भात राज्य सरकारने वेगळी भूमिका घेतली तर काही वावगे ठरणार नाही. वायनरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र या निर्णयाला विरोध होत असेल आणि तो निर्णय मागे घेतला तर मला वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही, अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली आहे.