Site icon Aapli Baramati News

Breaking News : मनोहरमामाचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला; तीन दिवसांची पोलिस कोठडी

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

संत बाळूमामांचे वशंज असल्याचे सांगून अघोरी उपचार आणि आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांच्या अटकेत असलेल्या मनोहरमामा उर्फ मनोहर भोसले यांना आणखी तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. दोन आरोपी फरार असल्याने आणि तपास पूर्ण झाला नसल्याने मनोहरमामाचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

बारामती शहरातील कसबा येथील शशिकांत खरात यांनी आपल्या वडिलांवर मनोहरमामांनी आर्थिक फसवणूक आणि अघोरी उपचार केल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणानंतर बारामती तालुका पोलिसांसह पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोहरमामांच्या हालचालींवर पाळत ठेवत सालपे येथून ताब्यात घेतले होते. बारामतीतील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. जे. गिऱ्हे यांनी सुरुवातीला मनोहरमामाला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडी संपल्याने आज त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

या प्रकरणात नाथबाबा उर्फ विशाल वाघमारे आणि ओंकार शिंदे हे दोघे फरारी आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपासही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे मनोहरमामाच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version