बारामती : प्रतिनिधी
बारामती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सचिन सातव यांची, तर उपाध्यक्षपदी रोहित घनवट यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार ही निवड करण्यात आली.
बारामती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद टांकसाळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्यासह बारामती बँकेचे आजी-माजी संचालक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार अध्यक्षपदासाठी सचिन सातव यांचा तर उपाध्यक्षपदासाठी रोहित घनवट यांचा अर्ज दाखल करण्यात आला. या दोन्ही पदांसाठी दोनच अर्ज आल्याने सचिन सातव आणि रोहित घनवट यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर सचिन सातव यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.