बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने बारामती एमआयडीसी परिसरात पिस्टल आणि काडतुस विक्रीसाठी आलेल्या धर्मराज वाघमारे या तरुणाला अटक केली आहे. वाघमारे याच्याकडून दोन पिस्टल आणि तीन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून भारतीय शस्त्र अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
बारामती एमआयडीसीतील सूर्यनगरी येथील मोनिका लॉन्स येथे धर्मराज पोपट वाघमारे (रा. शेळगाव, ता. इंदापूर) हा दोन पिस्टल आणि जीवंत काडतुसे विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकाला सूचना देवून संबंधित ठिकाणी रवाना होण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार मोनिका लॉन्स येथे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ठिकाणी लाल रंगाच्या स्विफ्ट (एमएच ४२ एएक्स ७०६०) कार येताच या कारमध्ये बसलेल्या धर्मराज वाघमारे याची झाडाझडती घेतली. त्यामध्ये दोन पिस्टल, तीन जीवंत काडतुसे आढळून आली. त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडील ५० हजार रुपये किमतीचे दोन पिस्टल, जीवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम ५ (२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश विधाते हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे आणि पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस नाईक रणजीत मुळीक, पोलीस अंमलदार राहुल पांढरे, नंदु जाधव, विजय वाघमोडे, विनोद लोखंडे, पोलिस नाईक सदाशीव बंडगर यांनी ही कारवाई केली.