बारामती : प्रतिनिधी
पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. बारामती तालुका अ वर्ग मतदारसंघातून शेतकरी कृती समितीचे नेते सतीशराव काकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने अजित पवार यांची जिल्हा बॅंकेवर बिनविरोध निवड झाली.
पुणे जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणूकीसाठी बारामती तालुक्यातून अ वर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीशराव काकडे यांचाही अर्ज दाखल करण्यात आलेला होता. मात्र आज सतीशराव काकडे यांनी आपला अर्ज माघारी घेतल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जिल्हा बॅंकेतून केली. तब्बल सातवेळा अजितदादांनी या बॅंकेचे प्रतिनिधित्व केले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाची भूमिका असलेल्या जिल्हा बॅंकेवर अजितदादांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष वेधले होते.