बारामती : प्रतिनिधी
लग्नाच्या आदल्या दिवशी नवरा-नवरीची वरात काढण्याची सध्या फॅशन बनली आहे.. रात्री उशीरापर्यंत डीजेच्या तालावर सर्वच बेभान होवून लग्नाचा आनंद साजरा करत असतात.. अशीच एक वरात रात्री उशीरापर्यंत सुरू असल्याचे समजल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या बारामती शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे.
काल रात्री बारामती शहरापासून जवळच असलेल्या एका गावात लग्नाची वरात निघाली होती. त्यासाठी खास भिगवणवरुन डीजे मागवण्यात आला होता. रात्री दहा वाजून गेल्यानंतरही ही वरात सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर बारामती शहर पोलिस ठाण्यातील काही कर्मचारी या गावात गेले. त्यांनी डीजे बंद करायला सांगत वरातही थांबवण्याबद्दल संबंधितांना सूचना केली. मात्र रंगात आलेली वरात थांबवल्यामुळे काहींनी डीजेची गाडी लक्ष्य करत तिची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. तर काहीजणांनी संबंधित कर्मचाऱ्यांवर धावून जात धक्काबुकी करत मारहाण केल्याचे समजते.
विशेष म्हणजे, या ठिकाणी सुरू असलेला गदारोळ पाहून काही पोलिस कर्मचाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला. शेवटी स्थानिक ग्रामस्थांनी मध्यस्थी करत जमावाच्या तावडीत सापडलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला बाहेर काढले. दरम्यान, याबाबत अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे.