
बारामती : प्रतिनिधी
बारामतीत एक धक्कादायक आणि संताप आणणारा प्रकार उघडकीस आला आहे. लैंगिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या पतीने आपल्या पत्नीला सात ते आठ जणांशी शारीरीक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी पतीसह सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे.
बारामती शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील ही घटना आहे. संबंधित पीडितेला लैंगिकदृष्ट्या कमकुवत असलेला पतीने सातत्याने इतरांशी संबंध ठेवण्यासाठी भाग पाडले. २०१७ ते २०२१ या कालावधीत हा सर्व प्रकार सुरू होता. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. सातत्याने सुरू असलेल्या या प्रकारामुळे पीडिता वैतागली होती. त्यातून तिने आपल्या माहेरी जाणे पसंत केले.
माहेरी गेल्यानंतर झाल्या प्रकाराची माहिती तिने आपल्या कुटुंबीयांना दिली. त्यानुसार दि. ९ डिसेंबर रोजी बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज या प्रकरणात आणखी आरोपींचा समावेश करण्यात आला. मात्र या गुन्ह्याबाबत पोलिसांकडून प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली होती. गोपनीयता पाळण्यामागे नेमके कारण काय याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी पतीसह पाचजणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.