Site icon Aapli Baramati News

Breaking : लिमटेकमध्ये पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्यांवर बारामती पोलिसांनी केला गुन्हा दाखल

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

विनापरवाना वरात काढून डीजे लावून तो बंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी बारामती तालुक्यातील लिमटेक येथील पाच जणांवर बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांनी ही माहिती दिली.

काल रात्री दहा ते साडे दहाच्या दरम्यान लिमटेक गावच्या हद्दीमध्ये एका लग्न समारंभासाठी विनापरवाना डीजे लावून काही लोक रस्त्यावर नाचत होते. ही माहिती बारामती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस हवालदार विठ्ठल मोरे, पोलीस हवालदार काळे व पोलीस नाईक नवनाथ शेंडगे हे त्या ठिकाणी गेले.

पोलिसांनी डीजे बंद करण्याची सुचना केल्यानंतर काही पुरुष व महिलांनी पोलिसांशी हुज्जत घातली. तसेच पोलीस डीजे घेऊन जात असताना त्या ठिकाणी काही लोकांनी डीजेवर दगडफेक करून डीजेची गाडी फोडली. तसेच पोलिसांना सुद्धा धक्काबुक्की केली. त्यावेळी त्या ठिकाणावरून डीजे गाडी पळून गेली. या दरम्यान पोलिसांच्या गाडीवरही काही लोकांनी दगड मारला.

या घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलीस निरीक्षक सुनील महाडिक हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिक लोकांच्या सहकार्याने तणाव नियंत्रित केला. या प्रकरणी अजय सोनवणे, अक्षय शिंदे, रोहित शिंदे, महेश खिलारे, भीमा मोहन सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version