Site icon Aapli Baramati News

Breaking : टपोरीगिरी कराल तर याद राखा; बारामतीत पोलिसांची धडक कारवाई

ह्याचा प्रसार करा

बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी घेतला आक्रमक पवित्रा

बारामती : प्रतिनिधी

बारामती शहर आणि परिसरात टपोरीगिरी करणाऱ्यांवर बारामती पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह अधिकारी आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरात विविध भागात मद्यपींसह टोळक्यांवर कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, यापुढे ही कारवाई सुरू राहणार असून टपोरीगिरी कराल, तर याद राखा असा इशाराच उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिला आहे.

बारामतीत आज सायंकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने शहराच्या विविध भागात फेरफटका मारला. त्यामध्ये शहरातील माळावरची देवी, रिंग रोड, नीरा डावा कालवा, आमराई आदी भागांमध्ये धडक कारवाई करत अनेकांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यात शहरातील विविध भागात विनाकारण बसणारी टोळकी, मद्यपी आणि नाहक गर्दी करून बसणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

बारामती शहरात आज संध्याकाळी पोलिसांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे टपोरीगिरी करणारांची चांगलीच भंबेरी उडाली. बारामती शहरात ही कारवाई सातत्याने सुरू ठेवली जाणार आहे.

अनेकजण नियमबाह्यपणे वाहने चालवणे, रस्त्याच्या कडेला बसून टपोरीगिरी करणे, दारू, सिगरेट, छेडछाड असे प्रकार करताना आढळून येतात. या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी दिली. बारामती हे सुसंस्कृत शहर असून शहर आणि परिसरात चुकीच्या कृत्यांना थारा दिला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बारामतीत आज संध्याकाळी अचानकपणे पोलिसांनी मारलेल्या एंट्रीमुळे अनेकांची चांगलीच गोची झाली.  आजच्या कारवाईत पोलिसांनी अनेकांची उचलबांगडी केली. पोलिसांच्या या पवित्र्यामुळे ‘टपोरीगिरी’ करना मना है असाच संदेश या निमित्ताने युवा वर्गाला विशेषत: नाहक नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्यांमध्ये गेला आहे.   


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version