Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : बारामतीत रुग्ण सहाय्यता कक्षाचं काम होणार अधिक व्यापक; रुग्णांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी उभी राहणार सक्षम यंत्रणा

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामतीत रुग्ण सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाद्वारे रुग्णांच्या अडीअडचणींवर संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून तोडगा काढण्यात येत आहे. त्यामुळे रुग्णांचाही प्रतिसाद वाढत असून येत्या काळात हे काम अधिक व्यापक स्वरूपात होणार आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीत आज एक बैठक पार पडली असून ग्रामीण स्तरापर्यंत कक्षाबद्दल माहिती पोहोचवण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.

राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ रुग्णांना मिळवून देतानाच अन्य संस्थांच्या व यंत्रणांच्या माध्यमातूनही मदत उपलब्ध करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्ण सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला आहे. ना. अजित पवार यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील मुसळे यांच्यासह जिल्हा परिषदेतील समन्वयक डॉ. प्रशांत अष्टीकर, महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या समन्वयक डॉ. प्रीती लोखंडे हे प्रत्येक गुरुवारी बारामतीत रुग्ण कक्षात उपस्थित राहत आहेत. त्यांच्याकडून रुग्णांच्या समस्यांवर तात्काळ तोडगा काढला जात आहे.

या कक्षाला रुग्णांचा दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही रुग्ण सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्या ठिकाणीही दैनंदिन रुग्णांच्या समस्येचे निराकरण केले जात असून स्वतंत्र समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. या कक्षाची व्याप्ती टप्प्याटप्प्याने वाढवली जाणार आहे. त्याद्वारे रुग्णांना अधिकाधिक माध्यमातून मदत केली जाणार आहे.

या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील मुसळे यांनी आढावा घेत आहेत. रुग्णांना कोणत्याही स्वरूपाची वैद्यकीय अडचण येत असते. या अडचणी सोडवण्यासाठी सर्वच यंत्रणांशी समन्वय ठेवून हा कक्ष कार्यरत राहणार आहे. त्यासाठी दैनंदिन नोंद ठेवून त्याचा पाठपुरावाही केला जाणार आहे.

दरम्यान, आज बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एक बैठक पार पडली. या बैठकीस ना. अजित पवार यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील मुसळे, गटविकास अधिकारी अनिल बागल, समन्वयक प्रशांत अष्टीकर, डॉ. प्रीती लोखंडे यांच्यासह परिसरातील आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, आशा प्रवर्तक उपस्थित होते. या बैठकीत रुग्ण सहाय्यता कक्षाबद्दल ग्रामीण स्तरावर गरजू रुग्णांपर्यंत माहिती पोहोचवण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. विविध शस्त्रक्रियांसह आजारांवरील उपचार आणि त्यासाठीच्या योजना याबद्दलही यावेळी माहिती देण्यात आली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version