बारामती : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवार दि. २४ ऑक्टोबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी उपमुख्यमंत्री व पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अजितदादांचा नागरी सत्कारही आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाची जय्यत तयारी आयोजकांकडून करण्यात आली आहे.
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या ६२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. याचवेळी अजितदादांच्या नागरी सत्काराचेही आयोजन करण्यात आले आहे. माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला पुरंदरचे आमदार संजय जगताप, वाई-खंडाळ्याचे आमदार मकरंद पाटील, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मंगळवारी दुपारी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सोमेश्वरमध्ये भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. नव्याने उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच अजितदादा सोमेश्वर परिसरात येत आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, आता येत्या काही दिवसांवर दिवाळी येवून ठेपली आहे. त्यामुळे सोमेश्वरच्या सभासदांसाठी काय घोषणा होणार याकडे कार्यक्षेत्राचे लक्ष लागले आहे.