Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा समिती व करिअर कट्टा अंतर्गत पोलीस भरतीपुर्व  प्रशिक्षण केंद्रातून पोलीस उपनिरीक्षक पदावर सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. करिश्मा वणवे, रूपाली गरगडे, शितल उत्तेकर, अक्षय पवार, शरद भरणे, अजयसिंह भाळे या विद्यार्थ्यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे यांनी दिली.

नुकताच राज्य सेवा परीक्षेचा निकाल हाती आला आहे. त्यामध्ये विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी महाविद्यालयातील तब्बल ११० विद्यार्थ्यांची पोलिस शिपाई पदावर निवड झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला होता.

मागील पाच वर्षात विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रातून ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील जवळपास १७८ विद्यार्थी पोलीस उपनिरीक्षक, तहसीलदार, लेखाधिकारी, विक्रीकर निरिक्षक, लेखापरीक्षक, पोलीस कॉन्स्टेबल आदी पदांवर विराजमान झालेले आहेत. ग्रामीण भागातील राज्यसेवा परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वोत्कृष्ट अभ्यासाचे ठिकाण म्हणून विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाची ओळख निर्माण झाली आहे. स्पर्धा परीक्षा समितीचे समन्वयक डॉ. सुनिल ओगले, विशाल चव्हाण व स्पर्धा परीक्षा समितीतील सर्व सदस्यांनी कठोर मेहनत घेत विद्यार्थी घडवण्याचे काम केले आहे.

या यशाबद्दल विद्या प्रतिष्ठान संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, विश्वस्त सुनेत्रा पवार, खजिनदार युगेंद्र पवार, सचिव ॲड. नीलिमा गुजर,  डॉ. राजीव शहा, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे, उपप्राचार्य डॉ. श्यामराव घाडगे व डॉ.लालासाहेब काशीद, निलीमा पेंढारकर, विशाल चव्हाण यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version