Site icon Aapli Baramati News

BIG NEWS : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या येत्या रविवारी बारामतीत; शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळेही राहणार उपस्थित..

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या हे येत्या रविवारी दि. २५ जून रोजी बारामतीत येत आहेत. अहिल्या विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे आयोजित अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत. तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अहिल्या विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रातील कार्यरत गुणवंत व्यक्तींचा सन्मानही केला जातो. या वर्षी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे यांचाही विशेष सन्मान केला जाणार आहे. रविवार दि. २५ जून रोजी दुपारी ३ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, अजित पवार यांच्यासह जिल्ह्यातील आमदार, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

सिद्धरमय्या हे स्वत: धनगर समाजातील नेते असून नुकत्याच झालेल्या कर्नाटक निवडणुकीत त्यांना दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्या विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिद्धरमय्या यांचा विशेष सत्कार केला जाणार असल्याचे विश्वासराव देवकाते यांनी सांगितले. तसेच सलग सातवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल सुप्रिया सुळे यांचाही गौरव केला जाणार आहे.

रविवारी बारामतीत होणाऱ्या या कार्यक्रमाला अधिकाधिक नागरिकांनी व समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वासराव देवकाते यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रय येळे, मदनराव देवकाते, गुलाबराव देवकाते, किसन तांबे, लक्ष्मण गोफणे, राहुल झारगड, बाळासाहेब बंडगर, वैभव मोरे, दत्तात्रय पुणेकर, राजाभाऊ झारगड, अलीअसगर नगरवाला आदी मान्यवर उपस्थित होते.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version