बारामती : प्रतिनिधी
सध्या सर्वत्रच दीपावलीचा उत्साह पाहायला मिळत आहे. बारामतीत पवार कुटुंबीय एकत्रितपणे दिवाळी साजरी करत आहेत. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या परंपरेनुसार उद्या गुरुवारी दि. २६ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी ‘दिवाळी भेट’ कार्यक्रम होणार आहे. स्वत: शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासह पवार कुटुंबातील सदस्य यावेळी उपस्थित राहून कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारणार आहेत.
दोन वर्षे कोरोनामुळे दिवाळीसह अन्य सणांवर काही निर्बंध आले होते. बहुतांश सण-उत्सव हे मर्यादीत स्वरूपात साजरे होत होते. यावर्षी मात्र सर्व निर्बंध उठवण्यात आल्यामुळे दिवाळी सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे पवार कुटुंबीय एकत्रितपणे दिवाळीचा सण साजरा करीत आहेत. दिवाळी पाडव्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गोविंद बागेत ‘दिवाळी भेट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
गोविंद बागेत होणाऱ्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासह पवार कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत. यावेळी कार्यकर्त्यांना पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमाची गोविंद बागेत जय्यत तयारी करण्यात आली आहे.