बारामती : प्रतिनिधी
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज बारामतीत पत्रकारांशी बोलताना थेट बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाचं गणित पत्रकारांसमोर मांडलं. मागील निवडणुकीत भाजप उमेदवाराला पडलेल्या मतांमध्ये वाढच होणार असून अजितदादा आमच्यासोबत आल्यामुळे त्यात वाढ होणार आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची समन्वय बैठक पार पडली. या बैठकीला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार राहुल कुल, भाजप जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, सुरेश घुले, अशोकराव टेकवडे, बाळासाहेब गावडे, शिवसेनेचे सुरेंद्र जेवरे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, संदीप खर्डेकर आदी मान्यवरांसह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
२०१९ साली झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात भाजपने ५ लाख ३१ हजार मते मिळवली होती. ही मते आजही जागेवरच असून त्यात आणखी वाढच होईल. तसेच आता अजितदादा आमच्यासोबत आले आहेत, त्यांच्यासोबत निम्मी मते आली आहेत. त्यामुळे यावेळी महायुतीचाच उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.
राजकारणात तराजू लावावा लागतो. त्यामध्ये शरद पवार यांचा पराभव हा आमच्यासाठी जास्त वजनदार असल्याचे सांगून चंद्रकांत पाटील म्हणाले, विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस नावाचं औषधच लागू पडेल. त्यासाठी फार काळ वाट पहावी लागणार नाही. लवकरच हे सर्वजण एकत्र दिसतील. शरद पवार यांचा पराभव करणे एवढंच कारण आमच्या कार्यकर्त्यांसाठी पुरेसं असून ते या निवडणुकीत पाहायला मिळेल, असंही त्यांनी नमूद केलं.