
बारामती : प्रतिनिधी
अनधिकृत वीज वापरामुळे महावितरणाला मोठा तोटा सोसावा लागत आहे. त्यामुळे महावितरणकडून याबाबत कठोर धोरण स्वीकारले असून अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता एस. आर. पावडे यांनी दिली.
विद्युत वितरण नियंत्रण समिती सदस्य विश्वास मांढरे यांनी विद्युत ग्राहक शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्युत नियंत्रण समिती अध्यक्ष अॅड.रविंद्र माने, महावितरणचे कार्यकारी अभियंता जी. एम. लटपटे, उपअभियंता जी. व्ही.गावडे, माळेगाव शाखा अभियंता आर.एस.राख यांच्यासह शेतकरी, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एस.आर.पावडे म्हणाले की, महावितरणच्या वतीने शेतकरी ग्राहकांच्या सर्व समस्या सोडविल्या जातील. सर्व्हिस कनेक्शन एका दिवसात दिले जाईल. पाणंद रस्त्यावरील पोलची उंची वाढवली जाईल. पाणी पुरवठा समितीच्या धर्तीवर शंभर टक्के वसुली असलेल्या शेतकरी वर्गाच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य दिले जाईल.
कमी दाबाने विज मिळणे, नवीन कनेक्शन, विद्युत बिल कमी करणे, विद्युत तारांची उंची वाढविणे, ट्रान्सफार्मरच्या समस्यांबाबत शेतकरी गामजी गोफणे, अशोक तावरे, प्रकाश शेटे, भारत खोमणे यांनी प्रश्न उपस्थित केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास मांढरे यांनी केले. सुत्रसंचलन डॉ.राजेंद्र सस्ते यांनी केले. तर आभार सचिन कुचेकर यांनी मानले.