बारामती : प्रतिनिधी
मुलीला आणण्यासाठी शाळेत गेलेल्या शशिकांत कारंडे यांची पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करत खून करणाऱ्या तिघा आरोपींना बारामती पोलिसांनी जेरबंद केले आहे. काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर अवघ्या२४ तासांच्या आत आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांनी यश मिळवले आहे.
शशिकांत बाबासाहेब कारंडे हे काल आपल्या मुलीला आणण्यासाठी श्रीरामनगर येथील कविवर्य मोरोपंत हायस्कूलमध्ये गेले होते. त्यावेळी या तिघा अल्पवयीन आरोपींनी त्यांच्यावर कोयत्याने वार करत त्यांची निर्घृणपणे हत्या केली. या घटनेनंतर बारामतीत एकच खळबळ उडाली होती.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके पाठवली होती. पोलिसांनी तात्काळ तपासचक्रे फिरवल्यामुळे या आरोपींचा ठिकाणा लागला. त्यानुसार या आरोपींना आज ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांनीही यापूर्वी शशिकांत कारंडे यांचा मुलगा शेखर याच्यावर प्रेमात अडथळा आणत असल्याच्या संशयावरून वार केले होते. याबाबत कारंडे यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर या तिघांना अटकही झाली होती.
प्रेमप्रकरण आणि त्यातून झालेल्या तुरुंगवासामुळे या तिघांनीही कारंडे कुटुंबीयांना लक्ष्य केले होते. त्यातूनच गुरुवारी शशिकांत कारंडे यांचा निर्घृणपणे खून करण्यात आला. पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या पथकाने आरोपींना जेरबंद केले.