Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : मुहूर्त पाहून टाकला दरोडा, बारामतीतील महिलेचे हातपाय बांधून नेला एक कोटींचा ऐवज; स्थानिक गुन्हे शाखेने केला टोळीचा भांडाफोड..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

२१ एप्रिल रोजी बारामती एमआयडीसी परिसरातील देवकातेनगर येथील एका महिलेचे हातपाय बांधून तिला मारहाण करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा जवळपास १ कोटींचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली होती. जवळपास चार महिन्यांनंतर या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या टोळीकडून रोख रक्कम आणि दागिने असा ७६ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

२१ एप्रिल २०२३ रोजी बारामती तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील देवकातेनगर येथे ही घटना घडली होती. येथे वास्तव्यास असलेले सागर शिवाजी गोफणे हे तिरूपती बालाजी येथे दर्शनासाठी गेले होते. त्याची पत्नी तृप्ती सागर गोफणे या मुलासह घरीच होती. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी गोफणे यांच्या घराच्या कंपाऊंडवरुन प्रवेश केला. तृप्ती गोफणे हिला मारहाण करत तिचे हातपाय बांधून तोंडात कापडाचा बोळा कोंबला.

त्यानंतर या चोरट्यांनी घरातील ९५ लाख ३० हजार रुपये रोख, २० तोळे वजनाचे ११ लाख ५९ हजार रुपये किमतीचे दागिने आणि ३५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल असा १ कोटी ७ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. बारामती शहरातील रहदारीच्या परिसरात ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे कोल्हापूरचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या घटनेची गंभीर दखल घेत तपासाच्या सूचना दिल्या होत्या.

पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनीही या प्रकरणाचा प्रत्येक आठवड्याला आढावा घेत मार्गदर्शन केले. या आरोपींनी कोणताही पुरावा मागे सोडला नव्हता. मात्र आरोपींचे वर्णन, सीसीटीव्ही फुटेज, गुप्त बातमीदारांची माहिती अशा अनेक बाबींद्वारे या गुन्ह्याची उकल करण्यात यश आले. या गुन्ह्यात एमआयडीसीतील कामगारांचा सहभाग असल्याची माहिती पुढे आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या हालचालींवर लक्ष केंद्रीत केले.

त्यानुसार सचिन अशोक जगधने (वय ३०, रा. गुणवडी), रायबा तानाजी चव्हाण ( वय ३२, रा. शेटफळ हवेली, इंदापूर), रवींद्र शिवाजी भोसले (वय २७, रा. निरावागज), दुर्योधन उर्फ दीपक उर्फ पप्पू धनाजी जाधव (वय ३५, रा. जिंती, फलटण),  नितीन अर्जुन मोरे (वय ३६, रा. धर्मपुरी, माळशिरस) या पाचजणांना विविध ठिकाणाहून ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली.

सागर गोफणे याचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय असून त्याच्याकडे भरपूर पैसा असल्याची माहिती आरोपी सचिन जगधने याला मिळाली होती. त्यानुसार त्याने कट रचला. विशेष म्हणजे रामचंद्र वामन चव्हाण (वय ४६ , रा. आंदरुड, फलटण) या ज्योतिषाने या दरोडा टाकण्यासाठी मुहूर्त काढून दिला होता आणि त्याच्याच मार्गदर्शनाखाली हा गुन्हा करण्यात आल्याचेही पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या ज्योतिषालाही पोलिसांनी अटक केली आहे.

आतापर्यंत ६० लाख ९७ हजार रुपये रोख आणि १५ लाख ३५ हजार रुपये किमतीचे २६ तोळे दागिने असा ७६ लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. या आरोपींना बारामती येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता २५ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे आरोपी सध्या बारामती तालुका पोलिसांच्या ताब्यात आहेत.

विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे, राहुल गावडे, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, प्रदीप चौधरी, शिवाजी ननवरे, अमित सिदपाटील, गणेश जगदाळे, सहाय्यक फौजदार रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, हवालदार सचिन घाडगे, ज्ञानेश्वर क्षीरसागर, अजित भुजबळ, अभिजीत एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, राजू मोमीन, अतुल डेरे, चंद्रकांत जाधव, मंगेश थिगळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, दीपक साबळे, विक्रम तापकिर, विजय कांचन, अजय घुले, पोलिस नाईक नीलेश शिंदे, अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, संदीप वारे, धीरज जाधव, अक्षय नवले, मंगेश भगत, चालक मुकुंद कदम, प्रमोद नवले, दगडू वीरकर, अक्षय सुपे यांनी ही कामगिरी केली आहे.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version