बारामती : प्रतिनिधी
बारामती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी सचिन सातव यांची फेरनिवड करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या सुचनेनुसार तीन दिवसांपूर्वी विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष, तज्ञ संचालक आणि कार्यकारी संचालक या चौघांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आज नव्याने सचिन सातव यांची निवड करण्यात आली.
बारामती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव, उपाध्यक्ष रोहित घनवट, तज्ञ संचालक श्रीनिवास बहुळकर आणि प्रितम पहाडे यांनी राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर बारामतीतील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. बॅंक फायद्यात असताना राजीनामे कशासाठी घेतले याबद्दल तर्कवितर्क लढवले जात होते.
आज संचालक मंडळाच्या बैठकीत निवड नव्याने करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदासाठी सचिन सातव यांची फेरनिवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्ष रोहित घनवट आणि तज्ञ संचालक श्रीनिवास बहुळकर यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. तर प्रितम पहाडे यांचे संचालकपद कायम ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, मागील काही दिवस बारामती बॅंकेच्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे प्रकरण चांगलेच चर्चेत होते. अजितदादांच्या मनात नेमकं काय याबद्दल तर्कवितर्क लढवण्यात येत होते. अखेर आज बॅंकेची धुरा पुन्हा सचिन सातव यांच्याकडे आल्यामुळे अजितदादांच्या धक्कातंत्राचीच चर्चा आता बारामतीत रंगली आहे.