Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : बारामतीत भाजप कार्यालयावर फेकली शाई; सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याने केली शाईफेक

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती शहरातील भाजप कार्यालयावर आज पहाटे एका सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याने शाई फेकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सचिन जगताप या कार्यकर्त्याला बारामती शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या घटनेनंतर खळबळ उडाली असून बारामतीतील भाजप कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यपालांसह भाजप नेत्यांकडून सातत्याने महापुरुषांचा अवमान करणारी विधाने येत आहेत. यामुळे बहुजन समाजात संतापाची भावना निर्माण झालेली आहे. अशातच सर्वत्र निषेध, आंदोलने होत असताना आज सकाळी बारामतीतील भाजप कार्यालयावर शाई फेकण्यात आल्याचा प्रकार समोर आला. याबाबत बारामती शहर पोलिसांनी सचिन जगताप या सामाजिक कार्यकर्त्याला ताब्यात घेतले आहे.

सचिन जगताप हा जनक्रांती संग्राम संघटनेचा कार्यकर्ता आहे. आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास त्याने भाजप कार्यालयावर शाई फेकल्याची माहिती समोर येत आहे. मागील काही दिवसांत भाजप नेत्यांकडून सातत्याने महापुरुषांचा अवमान केला जात आहे. त्यामुळे सचिन जगताप याने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, या घटनेनंतर भाजप कार्यालय परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सचिन जगताप याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version