बारामती : प्रतिनिधी
आईने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून नाराज झालेल्या शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बारामती तालुक्यातील कऱ्हावागज येथे घडली. या घटनेमुळे कऱ्हावागज परिसरात शोककळा पसरली आहे.
शुभम मोतीराम धोत्रे असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. तो अंजनगाव येथील सोमेश्वर विद्यालयात इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार शुभमच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. त्याची आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. शुभम गेली काही दिवसांपासून आईकडे नवीन मोबाईल घेण्यासाठी हट्ट करीत होता. पण परिस्थितीमुळे आई मोबाईल घेऊ शकत नव्हती.
आपल्याला नवीन मोबाईल मिळत नसल्याने निराश झालेल्या शुभमने आज गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण अवचर यांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अधिक तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.