बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरासह एमआयडीसी परिसरात अज्ञात गुंडांनी तलवारी दाखवत दहशत माजवल्याचा प्रकार घडला आहे. बारामती शहरातील सराफ पेट्रोलपंप, टीसी कॉलेज आणि एमआयडीसीत तीन ते चार ठिकाणी तलवारीचा धाक दाखवून तोडफोड केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बारामतीत आज सायंकाळच्या सुमारास अज्ञात गुंडांनी तलवारीचा धाक दाखवत दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे. बारामती शहरातील सराफ पेट्रोलपंप, टीसी कॉलेज आणि एमआयडीसी परिसरात तलवारीचा धाक दाखवत तोडफोड केल्याची माहिती समोर येत आहे. दुचाकीवरून आलेल्या या गुंडांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तलवारीचा धाक दाखवत तोडफोड करण्यासह पाटस रस्त्यावर एकावर वार केल्याची माहिती मिळत आहे.
बारामती हे सुरक्षित शहर म्हणून ओळखले जाते. मात्र आजच्या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही घटना पाहता बारामतीत वाढत असलेल्या गुन्हेगारीवर पोलिसांकडून अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यातूनच आजचा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.पोलिस यंत्रणेकडून गुन्हेगारीबाबत योग्य उपाययोजनांसह ठोस पावले उचलण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे.
एकीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सातत्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासह नागरिकांना सुरक्षितपणे राहता यावे यासाठी प्रयत्न करीत असतात. अशातच बारामतीत धक्कादायक आणि नागरिकांमध्ये भीती वाढवणारी घटना समोर आली आहे. बारामतीत आजवर कधीही अशा घटना घडलेल्या नाहीत. त्यामुळे आता या घटनेबाबत अजितदादा काय निर्णय घेतात याकडेच आता लक्ष लागले आहे.