Site icon Aapli Baramati News

BIG BREAKING : अजितदादांनी शब्द दिला अन पूर्णही केला; बारामतीच्या जिरायत भागातील पाणीप्रश्नाबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील जिराईत पट्ट्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी वरवंड व शिर्सुफळ तलावात पाणी सोडणाऱ्या खडकवासला कालव्यावर क्रॉसगेट बांधून त्याचे हेड वाढविण्याच्या पर्यायाची तपासणी करुन आवश्यक योग्य कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. पहिल्या टप्प्यात जनाई-शिरसाईसाठी 15 मेगा वॅट तर दुसऱ्या टप्प्यात पुरंदर उपसा सिंचन योजनेसाठी 45 मेगा वॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

बारामती तालुक्यातील जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेसह सिंचनाच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता ह.वि.गुणाले, मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे (व्हिसीद्वारे), उप वन संरक्षक (वन्यजीव) डॉ. तुषार चव्हाण (व्हिसीद्वारे), पुणे पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता कुमार पाटील, कार्यकारी अभियंता दि. म. डुबल, कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, कार्यकारी अभियंता म.भ. कानिटकर, नियोजन विभागाचे उपसचिव मिलिंद कुलकर्णी, व्हिसीद्वारे उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, बारामतीचे प्रांताधिकारी वैभव नावडकर, अधीक्षक भूमी अभिलेख सुर्यकांत मोरे यांच्यासह बारामती पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह खलाटे, दिलीपआप्पा खैरे, ज्ञानेश्वर कौले, राजेंद्र बोरकर, विजयराव खैरे, महेश गायकवाड, प्रकाश काळखैरे, त्रिंबक चांदगुडे, संजय काकडे, काशिनाथ कुतवळ, गणेश भोंडवे, अमोल वाबळे, दत्तात्रय पानसरे, राजकुमार लव्हे यांच्यासह जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेशी संबंधित पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

उपमख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, बारामती तालुक्यातील कऱ्हा नदीवरील तसेच नीरा नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्यांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. या सर्व्हेक्षण केलेल्या बंधाऱ्याचे तातडीने नूतनीकरण करण्यात यावे. त्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच बारामती तालुक्यातील जिरायत भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मंजूर असणारे पाणी पुरेशा स्वरुपात मिळावे यासाठी जानाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी वरवंड आणि शिर्सुफळ तलावात खडकवासला कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी पुरेशा दाबाने जाण्यासाठी क्रॉसगेट बांधून त्याचे हेड उंच करण्याच्या पर्यायावर तपासणी करुन योग्य निर्णय घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

जनाई योजनेमध्ये कुसेगाव, पडवी, हिंगणीगाडा शाखा कालवे बंद पाईपलाईनद्वारे त्याचबरोबर जनाई उजवा कालवा, जनाई डावा कालव्यासह पुरंदर शाखा कालवे अस्तरीकरण करण्याचे प्रस्तावित आहे, त्याची पहाणी करुन आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. जनाई उपसा सिंचन योजनेवर पाणी वापर संस्था चार महिन्यात अद्ययावत करुन घ्या. तसेच जनाई-शिरसाई योजनेतील सर्व तलावांच्या साठवण क्षमतेची फेरतपासणी करुन घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

जनाई उपसा सिंचन योजनेचे मायनर क्रमांक 6 चे काम पूर्ण करण्यासाठीच्या अडचणी सोडविण्यासाठी त्याचे पूर्ण सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. त्याचबरोबर जनाई उपसा सिंचन योजनेच्या सुपे शाखा कार्यालयासाठी ग्रामपंचायतीने चार गुंठा जागा तातडीने उपलब्ध करुन द्यावी जलसंपदा विभागाने कार्यालय उभारावे, त्याचबरोबर बारामती तालुक्यातील जिरायत भागातील सिंचनाच्या प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

दरम्यान, जानाईच्या पाण्याबाबत सुपे येथे शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनापासून उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला भेट देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३० जानेवारीपर्यंत यावर तोडगा काढण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार आज मंत्रालयात बैठक घेत कृती समितीने केलेल्या सर्व मागण्या मान्य करत अजितदादांनी दिलेला शब्द पूर्ण केला.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version