
बारामती : प्रतिनिधी
बारामती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी केवळ तीन अर्ज राहिले आहेत. उर्वरीत सर्वजणांनी आपले अर्ज माघारी घेतले असले तरी तीन अर्ज राहिल्यामुळे १३ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. तर इतर मागास प्रवर्गातून रोहित घनवट आणि भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून उद्धव गावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
बारामती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या. आज अर्ज छानणीनंतर शिल्लक राहिलेल्या १०३ अर्जांपैकी जवळपास सर्वच इच्छुकांनी आपले अर्ज माघारी घेतले. त्यामध्ये इतर मागास प्रवर्गातून रोहित वसंतराव घनवट आणि भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून उद्धव सोपानराव गावडे या दोघांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र सर्वसाधारण प्रवर्गातून एक, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून एक आणि महिला राखीव प्रवर्गातून एक असे तीनच अर्ज राहिल्यामुळे १३ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
कॉँग्रेसचे पदाधिकारी डॉ. विजयकुमार रामचंद्र भिसे यांनी खुल्या आणि अनुसचीत जाती जमाती प्रवर्गात आपली उमेदवारी कायम ठेवली. तसेच महिला राखीव प्रवर्गातून डॉ. भिसे यांच्या कन्या प्रतीक्षा भिसे यांनी आपला अर्ज ठेवला आहे. त्यामुळे तेरा जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीकडून ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यामध्ये यश आले नसल्यामुळे केवळ राष्ट्रवादीपुरस्कृत सहकार प्रगती पॅनलचे तेरा आणि विरोधात तीन असे सोळा उमेदवार रिंगणात आहेत.