
बारामती : प्रतिनिधी
बारामतीतून पुण्याला जाणाऱ्या मुलीला बसमधून उतरवून आळंदीत नेवून बळजबरीने लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित मुलीच्या फिर्यादीवरुन तिघांवर बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ऋषिकेश अविनाश जगताप (रा. कोळी मळा, बारामती), शुभम काळे, किरण खोमणे या तिघांवर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ऋषिकेश जगताप व शुभम काळे या दोघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत बारामती शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ऋषिकेश जगताप हा या मुलीचा मागील सहा महिन्यांपासून पाठलाग करत होता. या मुलीचा त्याला विरोध होता. मात्र तो सतत लग्नाची मागणी घालत होता.
दि. ३० जानेवारी रोजी ही मुलगी पुण्याला जात असल्याचे समजल्यानंतर ऋषिकेश जगतापने तिचा पाठलाग करत बारामती शहरातील कसबा येथे बस थांबवून तिला उतरण्यास सांगितले. मात्र संबंधित मुलीने त्यास विरोध केला. त्यानंतर या मुलीला फोन करुन बसमधून उतरली नाही तर तुझ्या भावाला मारुन टाकण्याची आणि स्वतःही आत्महत्या करण्याची धमकी दिली. त्यामुळे ही मुलगी पुरंदर तालुक्यातील शिवरी येथे बसमधून उतरली.
ऋषिकेश जगतापने तिला शिवरीतून थेट आळंदीला नेऊन तिच्या मर्जीविरुद्ध तिच्याशी लग्न केले. शुभम काळे आणि किरण खोमणे हे या लग्नात साक्षीदार म्हणून उपस्थित होते. मुलगी पुण्यात पोहोचली नसल्याचे लक्षात आल्यानंतर ही बाब उघड झाली. मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार बारामती शहर पोलिसांनी ऋषिकेश जगताप, शुभम काळे आणि किरण खोमणे या तिघांवर भांदवि कलम ३६६, ३५४, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
यातील ऋषिकेश जगताप व शुभम काळे या दोघांना अटक करण्यात आली असून किरण खोमणे हा फरार झाला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज घोडके हे करीत आहेत.