बारामती : प्रतिनिधी
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यातच बारामतीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर बारामती नगरपरिषदेने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्यांनी दोन कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत, त्यांनाच नगरपरिषदेत प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे राज्य शासनाकडून काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यभरातील महाविद्यालयांसह काही जिल्ह्यातील शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर बारामती नगरपरिषदेनेही काही निर्बंध लागू केले आहेत. शहर आणि तालुक्यात मागील दोन दिवसांत रुग्णसंख्या वाढत असल्याने आता लसीकरण केलेल्या व्यक्तींनाच बारामती नगरपरिषदेत प्रवेश दिला जाणार आहे.
बारामती नगरपरिषदेत नागरिकांची कामानिमित्त सतत ये-जा सुरू असते. सध्याचा कोरोना संसर्गाचा वेग पाहता प्रत्येकाने लसीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे बारामती नगरपरिषदेत जायचे असल्यास दोन डोस घेतलेले असणे आवश्यक आहे. नागरिकांनी लसीकरण करून घेत स्वत: खबरदारी बाळगावी या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.