Site icon Aapli Baramati News

Big Breaking : अजितदादांनी शब्द केला खरा; बारामतीत होणार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि १०० खाटांचे रुग्णालय, राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब

ह्याचा प्रसार करा

मुंबई : प्रतिनिधी

बारामतीत शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि त्याला जोडून १०० खाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबत आज वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने आदेश पारित केले असून तब्बल ३०० कोटी रुपये खर्च करून या महाविद्यालय आणि रुग्णालयाची निर्मिती केली जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयानंतर आयुर्वेद महाविद्यालयही सुरू होणार असल्याने बारामती आता शिक्षणाच्या दृष्टीने अधिक प्रगत आणि सोईसुविधानियुक्त तालुका ठरणार आहे.   

बारामतीत आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय स्थापन करण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संकेत दिले होते. त्यानुसार याबाबत गेली अनेक दिवसांपासून कार्यवाहीही सुरू करण्यात आली होती. आज याबाबत वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभागाने आदेश पारीत करत बारामतीत आयुर्वेद महाविद्यालय सुरू करण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.

केंद्र शासन आणि केंद्रीय भारतीय चिकित्सा परिषदेच्या मान्यतेने १०० विद्यार्थी क्षमतेचे आयुर्वेद महाविद्यालय बारामतीत सुरू होणार आहे. त्या जोडीला १०० खाटांच्या क्षमतेचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. या महाविद्यालयासाठी महसूल विभागाच्या मान्यतेने आणि मंत्रीमंडळाच्या मंजुरीने जागाही निश्चित करण्यात आली आहे. महाविद्यालय आणि रुग्णालयात इमारतीसाठी तब्बल ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  या महाविद्यालयात तब्बल २५८ पदांची नियुक्ती होणार असून रुग्णालयात २३६ पदांची भरती केली जाणार आहे. तसेच स्वच्छता, आहार, सुरक्षा आणि वस्त्र स्वच्छता अशी कामे बाह्यस्त्रोतांकडून करून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.    


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version