Site icon Aapli Baramati News

BARAMATI : बारामती पोलिसांचं नेमकं चाललंय काय..? चोरी ३ लाखांची अन फिर्याद ३० हजारांची; हतबल तक्रारदाराची अजितदादांकडे धाव

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती शहरातील एका  गॅरेजमधून तीन लाख रुपयांचा माल चोरीला जाऊनही बारामती शहर पोलिसांनी केवळ ३० हजार रुपयांच्या चोरीची फिर्याद दाखल करून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत तक्रारदाराने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धाव घेतली आणि घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर अजितदादांनी या संपूर्ण प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बारामती शहरातील खंडोबानगर येथे सागर तानाजी देवकर यांच्या मालकीचे श्रेयश ऑटो हे चारचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. ८ जानेवारी रोजी या गॅरेजमधून ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. त्यावेळी सागर देवकर यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या दरम्यान, पोलिसांनी गॅरेजवर जाऊन घटनेची माहिती घेत आम्ही लवकरच चोराला पकडू असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर पुन्हा दि. १४ जानेवारी रोजी चोरीचा प्रकार घडला. त्यावेळीही सागर देवकर यांनी तक्रार दिली. मात्र पोलिसांनी त्याची कसलीही दखल घेतली नाही. त्यानंतर दि. १९ जानेवारी रोजीही पुन्हा चोरीचा प्रकार घडला.

सतत चोरी होत असल्यामुळे सागर देवकर यांनी दररोज रात्रीच्या वेळी गॅरेजवर पहारा देण्यास सुरुवात केली. त्यांनी मोठ्या शिताफीने एकाला चोरी करताना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या चोरट्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली देत चोरलेला माल कुणाला विकला याचीही माहिती दिली. मात्र पोलिसांनी सागर देवकर यांची फिर्याद घेताना ३ लाख २५ हजारांच्या मुद्देमालाची नोंद न करता केवळ ३० हजारांची चोरी दाखवली आहे.

दरोड्याचा गुन्हा दाखल होईल म्हणून पोलिसांनी कमी रकमेचा मुद्देमाल दाखवल्याची तक्रार सागर देवकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्याची दाखल घेत अजितदादांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, थेट अजितदादांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून यातील अनेक गौडबंगाल समोर येण्याची शक्यता आहे.

आधी अरेरावी, मग आर्जव..!

सागर देवकर यांच्या गॅरेजमध्ये तीनवेळा चोरीचा प्रकार घडल्यानंतर स्वत:च चोर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. मात्र पोलिसांनी ३० हजारांच्या चोरीची फिर्याद दाखल केली. त्यामुळे सागर देवकर हे प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी सतत संबंधित तपासी अधिकाऱ्यांची भेट घेत होते. त्यावेळी त्यांना अक्षरश: अरेरावीची भाषा वापरत तुम्ही कुठेही जा, फिर्याद बदलणार नाही असं सांगण्यात आलं. मात्र सागर देवकर हे अजितदादांकडे गेल्याचे समजताच संबंधित पोलिसांनी विनवणीची भाषा सुरू केली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version