बारामती : प्रतिनिधी
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. अशातच बारामतीतही राष्ट्रवादीकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. १६ फेब्रुवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत बूथ कमिटी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व शहराध्यक्ष जय पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष व चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाले आहे. त्यानंतर अजितदादांनी राज्यभर दौरे सुरू केले असून विविध मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. नुकताच पुण्यात युवा मेळावा पार पडला असून मुंबईतून स्वराज्य सप्ताहाची सुरुवात करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादीकडून जय्यत तयारी केली जात असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे.
बारामतीतही राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता बारामती शहरातील पाटस रस्त्यावरील वृंदावन गार्डन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अध्यक्षतेखाली बूथ कमिटी कार्यकर्ता मेळावा होणार आहे.
संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्याबरोबरच आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने अजितदादा या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्यास अधिकाधिक आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.