Site icon Aapli Baramati News

BARAMATI : राज्यपालांविरोधात बारामतीत राष्ट्रवादी कॉँग्रेस आक्रमक; सह्यांची मोहीम राबवत केली ‘ही’ मागणी

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आहे. अशातच आज बारामती शहर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माध्यमातून सह्यांची मोहीम राबवण्यात आली. राज्यपालांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी आग्रही मागणी करत आता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

आज सकाळी बारामती शहरातील तीन हत्ती चौकात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या माध्यमातून सह्यांची मोहीम राबवण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, माजी नगराध्यक्ष योगेश जगताप, पौर्णिमा तावरे,  युवकाध्यक्ष अविनाश बांदल, महिला अध्यक्षा अनिता गायकवाड, वनिता बनकर, आरती शेंडगे, सोशल मिडिया अध्यक्ष तुषार लोखंडे, अभिजीत जाधव, सूरज सातव, सुधीर पानसरे, नवनाथ बल्लाळ, पप्पू चव्हाण, बबलू जगताप, मयूर लालबिगे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सातत्याने राज्यपाल महापुरुषांचा अवमान करतात. मात्र सत्ताधारी त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाहीत हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. त्यामुळे त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी केली. तर राज्यपालांसह भाजप नेते सातत्याने छत्रपती शिवरायांसह महापुरुषांबद्दल महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे यापुढे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह नागरीक व विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेत राज्यपालांच्या हकालपट्टीच्या मागणीला पाठिंबा दर्शवला.

 


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version