Site icon Aapli Baramati News

BARAMATI CRIME : बारामतीत विवाहितेची गळफास घेत आत्महत्या; पतीसह सासू-सासऱ्यांवर बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

बारामती शहरानजीक असलेल्या जळोची येथे सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास लावून घेत आत्महत्या केली. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात संबंधित विवाहितेचा पती आणि सासू-सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौ. अर्पिता गणेश हेगडकर (वय २३) असे या आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याबाबत तिचे वडील सुरेश सोपान चोपडे यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अर्पिताचा गणेश हेगडकर याच्याशी २०२० मध्ये विवाह झाला होता. तेव्हापासून तिला पती गणेश दादा हेगडकर, सासरा दादा नामदेव हेगडकर आणि सासू विमल दादा हेगडकर हे सातत्याने त्रास देत होते.

माहेरून दागिने आण, जमिनी खरेदीसाठी पैसे आण अशा मागण्या सतत अर्पिताकडे केल्या जात होत्या. तसेच लग्नात मानपान केला नाही म्हणून तिला शिवीगाळ आणि दमदाटी केली जात होती. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शारीरीक व मानसिक त्रास दिला जात होता. त्यातूनच तिने काल दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.

या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात पती गणेश दादा हेगडकर, सासरा दादा नामदेव हेगडकर आणि सासू विमल दादा हेगडकर यांच्यावर भादंवि कलम ४९८, ३०४, ३५४ अ, ३०६, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बारामती शहर पोलिस करीत आहेत.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version