बारामती : प्रतिनिधी
प्रेमात जवळीक वाढली की लग्नापर्यंत विषय पोहोचतो अशी अनेक उदाहरणे आपण पाहतो. मात्र बारामती तालुक्यातील बाबुर्डीत एक वेगळाच प्रकार घडला आहे. एका बहाद्दराने एका मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचं आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंधही ठेवले आणि ऐनवेळी दुसऱ्याच मुलीशी लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे, पीडितेला लग्न करण्याची तयारी दाखवून ऐन लग्नादिवशीच पसार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यश नवनाथ खोमणे, वडील नवनाथ खोमणे, चुलते शेखर खोमणे यांच्यासह आई आणि मामा अशा पाचजणांवर बारामती तालुका पोलिसांनी बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी की, यश खोमणे याचे चुलते शेखर खोमणे हे बारामती तालुक्यातील बाबुर्डी येथील वसतीगृहावर अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या वसतीगृहात पीडितेचा भाऊ शिक्षण घेत होता. त्यावेळी ही पीडिता भावाला भेटण्यासाठी गेल्यानंतर यश आणि तिची ओळख झाली.
या ओळखीचा फायदा घेऊन यशने या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. आपण लग्न करू असं सांगत त्याने या पीडितेवर वारंवार बलात्कार केला. या दरम्यान, या दोघांच्या लग्नाबाबत चर्चा होत असताना यशच्या कुटुंबीयांनी तू खालच्या समाजाची आहेस, आमच्या मुलाशी लग्न करू शकत नाही असं म्हणत तिला लग्नाला नकार दिला. या दरम्यान, यशच्या कुटुंबियाने त्याचे नात्यातीलच एका मुलीशी धुमधडाक्यात लग्नही लावून दिले.
ही बाब समजल्यानंतर संबंधित पीडितेने पुन्हा लग्नाबद्दल विचारणा केली. त्यावर यशने लग्नाची तयारी दाखवली. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबीयांनी लग्नाची तयारी केली. मात्र हळद लागल्यानंतर ऐन लग्नावेळी यश खोमणे हा पळून गेला. त्यानंतर पीडितेने बारामती तालुका पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार यश खोमणे, त्याचे वडील नवनाथ खोमणे, चुलते शेखर खोमणे यांच्यासह आई आणि मामावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यश खोमणे याला पोलिसांनी अटक केली आहे.