बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील जळोची येथील एका हॉटेलमध्ये कोयता काढून दहशत निर्माण करणाऱ्या युवकाला बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे. वेटरशी झालेल्या वादातून रात्री हा प्रकार घडला. दरम्यान, या ठिकाणी एका पोलिस कर्मचाऱ्याने वेळीच धाव घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
उमेश खोमणे (रा. पिंपळी, ता. बारामती) असे बारामती शहर पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, रात्री १ वाजण्याच्या सुमारास बारामती शहरानजीक जळोची येथील हॉटेल कॉर्नर कट्टा येथे एका तरुणाची वेटरशी वादावादी झाली. त्यामुळे हा तरुण मोठमोठ्याने आरडाओरड करत हातात कोयता घेऊन दहशत निर्माण करत होता.
याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांना पथक पाठवण्याची सूचना केली. त्यानंतर पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन या युवकाला ताब्यात घेतले. दरम्यान, हा गोंधळ सुरू असतानाच पोलिस कर्मचारी दशरथ कोळेकर यांना ही बाब समजली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन संबंधित तरुणाला रोखले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमारे, सहाय्यक फौजदार जगदाळे, पोलिस कॉन्स्टेबल निकम, चालक मोघे, होमगार्ड नागे यांनी ही कारवाई केली.