बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आता टेनिस बॉलवरील सामनेही खेळवण्यात येणार आहेत. बारामतीतील युवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत मागणी केली. बारामतीतील स्टेडियम सर्वसामान्य मुलांसाठी उभारलं असून त्याचा सर्वांना उपयोग झाला पाहिजे असं सांगत अजितदादांनी मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर संबंधित युवकांनी अजितदादांच्या नावाने घोषणा देत आनंद व्यक्त केला.
बारामती शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर मागील काही काळापासून लेदर बॉलवरील सामने खेळवले जात आहेत. या ठिकाणी टेनिस बॉलवरील सामने होत नसल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना स्टेडियमचा फायदा होत नव्हता. ही बाब लक्षात घेत आरपीआयचे उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, माजी नगरसेवक गणेश सोनवणे, अभिजीत कांबळे यांच्यासह युवकांनी रविवारी बारामतीत आयोजित जनता दरबारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. त्यावर अजितदादांनी तात्काळ मुख्याधिकारी महेश रोकडे यांना हे स्टेडियम उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमची उभारणी ही सामान्य कुटुंबातील मुलांसाठी केली आहे. त्याचा त्यांना फायदा झालाच पाहिजे असे सांगत अजितदादांनी तात्काळ स्टेडियम उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधितांनी योग्य ते शुल्क भरून स्टेडियम वापरावं आणि स्वच्छतेबाबत दक्ष राहावं असंही त्यांनी यावेळी सांगितलं. युवकांच्या आग्रही मागणीवर तोडगा काढल्याबद्दल उपस्थित क्रिकेट खेळाडू व सामाजिक कार्यकर्त्यांनी अजितदादांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.