बारामती : प्रतिनिधी
बारामती-मोरगाव रस्त्यावरील जळगाव कडेपठार येथे एका भरधाव वेगातील कारने दिलेल्या धडकेत दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आज सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत असून संबंधित कार चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
ओंकार संतोष खांडेकर आणि रुपेश अमोल खांडेकर या दोन विद्यार्थ्यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर संस्कार संतोष खांडेकर हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. याबाबत माहिती अशी की, आज सकाळी हे तिघेही शाळेत निघाले होते. जळगाव कडेपठार गावात बारामती-मोरगाव रस्त्यावर मोरगावकडून भरधाव वेगात येणाऱ्या ह्यूंदाई कारने (क्र. एमएच २४ सी ८०४१) या शाळकरी मुलांना जोरदार धडक दिली.
या दरम्यान, मराठा समाजाच्या आंदोलनासाठी बंदोबस्तावर असलेल्या राहुल पांढरे, प्रवीण वायसे, विजय वाघमोडे आणि अमोल राऊत या पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ जखमी विद्यार्थ्यांना स्वत:च्या वाहनातून बारामतीतील खासगी रुग्णालयात नेले. परंतु ओंकार खांडेकर आणि रुपेश खांडेकर या दोघांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. तर संस्कार खांडेकर याला बारामतीतील गिरीराज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दुसरीकडे या कारने आणखी एका वाहनालाही धडक दिली आहे. माळेगाव पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित चालकावर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.