Site icon Aapli Baramati News

Baramati Breaking : किचनमध्ये जाण्यावरून त्यांच्यात झाला वाद; आचाऱ्याने केला नाशिकच्या तडीपार गुंडाचा खून, पोलिसांनी केली एक तासात आरोपीला अटक..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

किचनमध्ये जाण्यावरून झालेल्या वादातून एका आचाऱ्याने नाशिकमधील तडीपार गुंडाचा खून केल्याची घटना बारामती शहरानजीकच्या जळोची येथे घडली. या घटनेनंतर पंजाबला निघून चाललेल्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी अवघ्या एक तासात अटक केली आहे. दरम्यान, यातील मृत आचारी हा नाशिकमधून तडीपार असलेला सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

गणेश प्रभाकर चव्हाण (रा. मालेगाव, जि. नाशिक) असे या मृत तडीपार गुंडाचे नाव आहे. विकास दीपक सिंग (वय २३, मूळ रा. चंदीगड, पंजाब, सध्या रा. आमराई, बारामती) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश चव्हाण आणि विकास सिंग हे दोघेही जळोची येथील हॉटेल मातोश्री येथे कामाला होते. गणेश चव्हाण हा शाकाहारी जेवण बनवत असे. तर विकास सिंग हा रोटी बनवण्याचे काम करत होता.

या दोघांमध्ये दोन दिवसांपूर्वी वाद झाला. गणेश चव्हाण याने विकासला तू माझ्या शाकाहारी किचनमध्ये पाय ठेवू नकोस असे बजावले होते. त्यावेळी हॉटेल मालकाने दोघांमधील वाद मिटवला होता. मात्र काल रात्री पुन्हा त्यांच्यात वाद झाला. त्यामध्ये विकास सिंग याने गणेश चव्हाण याच्या चेहऱ्यावर अंगावर चाकूने वार करत त्याचा खून केला. या घटनेनंतर विकास सिंग हा आपल्या मूळ गावी अर्थात पंजाबला जाण्यास निघाला होता.

या दरम्यान ही घटना बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांना समजल्यानंतर त्यांनी तातडीने तपास पथकातील अंमलदार राम कानगुडे, पोलीस नाईक रणजीत मुळीक, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत, पोलीस अधिकारी श्री. लेंडवे यांना आरोपी पकडण्याबाबत सूचना केल्या. पोलिसांनी अधिक शोध घेतला असता बारामती शहरातील माळावरच्या देवी मंदिराजवळ विकास सिंग याला अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राहुल घुगे हे करीत आहेत.

दरम्यान, गणेश चव्हाण हा नाव बदलून बारामतीत वास्तव्यास होता. त्याची अधिक माहिती घेतली असता तो नाशिकमधील सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्याला नाशिक जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते.

पोलीस अधीक्षक  अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे, पोलिस उपनिरीक्षक लेंडवे, हवालदार राम कानगुडे, पोलीस नाईक अमोल नरूटे, रणजीत मुळीक,पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत राऊत, सहाय्यक फौजदार भागवत यांनी ही कारवाई केली.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version