Site icon Aapli Baramati News

BARAMATI BREAKING : साहेब, दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण ठामपणे उभे राहाल, हा विश्वास नाही तर खात्री; बारामतीत गोविंद बागेजवळ आगळावेगळा फलक

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप-सेना सरकारमध्ये सहभाग घेतल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अशातच बारामतीत पवार कुटुंबीय दिवाळीनिमित्त एकत्र आले आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंद बाग या निवासस्थानाजवळ अनिकेत पवार या कार्यकर्त्याने एक आगळावेगळा फलक लावला आहे. आदरणीय साहेब, दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण ठामपणे उभे राहाल हा विश्वासच नाही तर खात्री आहे अशा आशयाचा हा फलक सध्या लक्षवेधी ठरला आहे.

दरवर्षी दिवाळीनिमत्त संपूर्ण पवार कुटुंबीय बारामतीत असतात. पाडव्यानिमित्त गोविंद बाग येथे ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत असतात. मात्र जुलै महिन्यात अजितदादांनी आपल्या समर्थक आमदारांसह भाजप-सेना सरकारमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अशातच गोविंद बागेजवळ अनिकेत पवार या कार्यकर्त्याने आगळावेगळा फलक लावला आहे. हा फलक सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

आदरणीय साहेब, दादांना मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहाल हा विश्वास नाही, तर खात्री आहे असा आशय या फलकावर नमूद करण्यात आला आहे. या फलकावर ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह बारामती टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, युवा नेते पार्थ पवार आणि जय पवार यांचीही छायाचित्रे आहेत.

एकीकडे राष्ट्रवादीत दोन गट पडले असताना आम्ही कुटुंब म्हणून एकच आहोत हे सांगितले जाते. अशात गोविंद बागेजवळ हा फलक लावत कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त करतानाच पवार कुटुंबीयांनी एकत्रित असावं हीच भावना व्यक्त केली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात पवार कुटुंब राजकारणात एकत्र दिसणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version