बारामती : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर पुणे जिल्हा बॅंकेच्या रिक्त झालेल्या जागेवर माळेगाव येथील रणजित अशोकराव तावरे यांची निवड निश्चित झाली आहे. आज जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेवरुन रणजित तावरे यांची संचालकपदी निवड निश्चित करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यबाहुल्यामुळे पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांच्या जागी त्यांचे सुपुत्र युवा नेते पार्थ पवार यांना संधी दिली जाईल अशी चर्चा होती. मात्र आज सकाळी संचालक मंडळाच्या बैठकीत अजितदादांच्या सुचनेनुसार रणजित तावरे यांचे नाव निश्चित करण्यात आले.
जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाची आज बैठक होत आहे. या बैठकीत ही निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर निवडीची घोषणा होणार आहे. रणजित तावरे हे माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांचे पुतणे आहेत. तसेच माळेगाव येथील राजहंस सहकार संकुलाची धुरा ते यशस्वीपणे सांभाळत आहेत.
जिल्हा बॅंकेच्या संचालकपदासाठी अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी रणजित तावरे यांचे नाव सुचवले. तर आमदार दत्तात्रय भरणे व माजी आमदार रमेश थोरात यांनी अनुमोदन दिले. रणजित तावरे यांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नविन चेहऱ्याला संधी दिली आहे.