Site icon Aapli Baramati News

Baramati Breaking : बारामतीत होमगार्डसह पोलिस हवालदार लाचप्रकरणी एसीबीच्या जाळ्यात..!

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

वॉरंटमध्ये तक्रारदाराला अटक न करण्यासाठी एक हजारांची लाच घेणं बारामती शहर पोलिस ठाण्यातील हवालदार आणि होमगार्डला चांगलंच महागात पडलंय. आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत एका हवालदारासह होमगार्डवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस हवालदार अण्णासाहेब नामदेव उगले आणि होमगार्ड सनी शामराव गाढवे या दोघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याबाबत माहिती अशी की, तक्रारदाराला एका वॉरंटसंदर्भात अटक न करण्यासाठी होमगार्ड सनी गाढवे याने १ हजार रुपयांची लाच मागितली होती.  याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

लाचलुचपत विभागाने या प्रकरणाची शहानिशा केली असता हवालदार उगले यांनी लाचेसाठी प्रोत्साहन दिल्याचे समोर आले आहे. त्यानुसार होमगार्ड सनी गाढवेसह हवालदार अण्णासाहेब उगले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अण्णासाहेब उगले यांना अटक करण्यात आली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version