Site icon Aapli Baramati News

Baramati Breaking : बारामतीत शुक्रवारी मनोज जरांगे पाटील यांची सभा; मराठा क्रांती मोर्चाकडून जय्यत तयारी

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारलेल्या मनोज जरांगे पाटील यांची बारामतीत शुक्रवार दि. २० ऑक्टोबर रोजी सभा होणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं या सभेचं आयोजन करण्यात आलं असून ते या सभेत काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

बारामती शहरातील तीन हत्ती चौकात शुक्रवारी दुपारी ४ वाजता ही सभा होणार आहे. या सभेच्या अनुषंगाने मराठा क्रांती मोर्चाकडून जय्यत तयारी केली जात असून शहरात ठिकठिकाणी फलकही लावण्यात आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण केलं होतं. त्यानंतर सरकारने आश्वासन दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेत महाराष्ट्रभर दौरा केला.

१४ ऑक्टोबर रोजी जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत प्रचंड मोठी सभा घेत सरकारला इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या दौऱ्यांची सुरूवात केली आहे. त्यानुसार शुक्रवार दि. २० ऑक्टोबर रोजी ते बारामतीत येत आहेत. बारामतीतील तीन हत्ती चौकामध्ये त्यांची सभा होणार असून या सभेत ते काय बोलतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version