बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसात डेंग्युचा प्रादुर्भाव वाढला आहे. या पार्श्वभुमीवर बारामती शहरात प्रत्येक गुरुवारी कोरडा दिवस पाळला जाणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात दर गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
बारामतीत मागील काही दिवसात डेंग्युचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक नागरीक डेंग्युमुळे त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभुमीवर प्रशासनाने उपायोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून बारामती नगरपरिषदेने प्रत्येक गुरुवारी कोरडा दिवस पाळण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये नागरीकांनी अधिकाधिक सहभाग घेऊन आपले शहर रोगराईमुक्त राहण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन नगरपरिषदेकडून करण्यात आले आहे.
कोरडा दिवस पाळण्याच्या पार्श्वभुमीवर बारामती शहरातील पाणीपुरवठा प्रत्येक गुरुवारी दिवसभर बंद ठेवला जाणार आहे. शहर रोगराईमुक्त रहावे यासाठी नागरीकांनी प्रत्येक गुरुवारी कोरडा दिवस पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बारामती नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे.