बारामती : प्रतिनिधी
आजकाल विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे सर्व गोष्टी सहज शक्य होऊ लागल्या आहेत. त्याचाच प्रत्यय काल बारामतीतील एका घटनेमुळे आला. आईच्या पायातील जोडवे गिळलेल्या आठ महिन्यांच्या बाळाला बारामतीतील डॉ. सौरभ निंबाळकर यांनी शर्थीचे प्रयत्न करत जीवदान दिले.
बारामतीतील एका आठ महिन्यांच्या बाळाने खेळत असताना आईच्या पायातील जोडवे गिळले. सुरुवातीला काही काळ जोडवे गिळल्याची बाब लक्षात आली नाही. मात्र त्याला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. तसेच दूध पिणेही अचानकच बंद केले. त्यामुळे भयभीत झालेल्या पालकांनी या बाळाला बालरोगतज्ज्ञ डॉ. सौरभ मुथा यांच्याकडे आणले.
डॉ. मुथा यांनी या बाळाची प्राथमिक तपासणी करत एक्स रे काढला. त्यामध्ये त्याच्या घशात हे जोडवे अडकल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डॉ. मुथा यांनी तातडीने या बाळाला निंबाळकर हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या सूचना दिल्या. डॉ. सौरभ निंबाळकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन दुर्बिणीद्वारे या बाळाने गिळलेले जोडवे बाहेर काढायचा निर्णय घेतला.
त्यानुसार डॉ. सौरभ निंबाळकर यांनी शर्थीचे प्रयत्न करत या बाळाच्या घशात अडकलेले जोडवे अलगद बाहेर काढले. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. सध्या या बाळाची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मोठा धोका टळला आहे.