बारामती : प्रतिनिधी
धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी चंद्रकांत वाघमोडे यांनी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाची तीव्रता आता वाढत असून आज बारामती तालुक्यातील ग्रामीण भागात विविध गावे बंद ठेवत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तर झारगडवाडी येथे धनगर बांधवांनी बारामती-वालचंदनगर रस्त्यावर मेंढ्या आणत अनोख्या पद्धतीने रास्ता रोको आंदोलन केले.
धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसाठी चंद्रकांत वाघमोडे हे गेल्या नऊ दिवसांपासून बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली असून प्रशासनाकडून अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर आज बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये बंद पाळून आणि रास्ता रोको आंदोलन करत या मागणीला पाठिंबा देण्यात आला.
बारामती तालुक्यातील झारगडवाडी येथे काल मोठ्या प्रमाणात कॅण्डल मार्च काढण्यात आला. यामध्ये महिला व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आज उपोषणकर्ते चंद्रकांत वाघमोडे यांच्या सूचनेनुसार झारगडवाडी गाव बंद ठेवून रस्त्यावर मेंढ्या आणून बारामती-वालचंदनगर रस्ता अर्धा तास रोखण्यात आला. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आज सोनगांव, मेखळी, माळेगाव आदी ठिकाणीही गाव बंद आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.