Site icon Aapli Baramati News

BARAMATI BREAKING : बारामतीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून तक्रारदाराला दमदाटी; शिक्षण सचिवांनी दिले चौकशीचे आदेश

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

गेल्या काही काळात बारामतीत बोगस अकॅडमींनी उच्छाद मांडला आहे. त्यांची काही अधिकारीच पाठराखण करत असल्याच्या चर्चा आहेत. बारामतीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी थेट पालक व तक्रारदारांनाच अरेरावी करत अंगावर धावून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर आता राज्याचे शिक्षण सचिव रणजीतसिंह देओल यांनी या गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

बारामतीत मागील काही काळापासून बेकायदेशीर अकॅडमींचा सावळा गोंधळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मोहसीन पठाण यांनी या अकॅडमीविरोधात वेळोवेळी आंदोलने केली. तसेच राज्य व केंद्र सरकारकडे याबाबत तक्रारीही केल्या आहेत. या अकॅडमींशी संबंधित शाळांवरील कारवाईबाबत बारामती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संपत गावडे यांना वरिष्ठ पातळीवरून सुचना देण्यात आल्या आहेत.

शाळांवरील कारवाईबाबत माहिती घेण्यासाठी गेल्यानंतर संपत गावडे यांनी अरेरावीची भाषा वापरल्याची आणि अंगावर धावून आल्याची तक्रार मोहसीन पठाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर आता वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली असून गटशिक्षणाधिकारी संपत गावडे यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश शिक्षण सचिव रणजीतसिंह देओल यांनी दिले आहेत.

शिक्षण विभागाचे उपसचिव टिकाराम खरपटे यांना याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लवकरच याबाबत चौकशी होणार असून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे थेट शिक्षण सचिवांकडून आलेल्या या आदेशानंतर बारामती पंचायत समितीच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

दुसरीकडे, याच विभागात मागील काही काळात कार्यरत असलेल्या एका विस्तार अधिकाऱ्यानेही अशाच पद्धतीने बेकायदेशीरपणे चालणाऱ्या अकॅडमींची पाठराखण केली होती. माझे वरपर्यंत संबंध असल्याचं सांगून हा अधिकारी मनाला येईल तसं वागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे आता या चौकशीच्या निमित्तानं बारामती पंचायत समितीतील शिक्षण विभागातील सावळा गोंधळ समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version