Site icon Aapli Baramati News

BARAMATI BREAKING : मुलगा दारू पिऊन त्रास द्यायचा; वयोवृद्ध आई-वडिलांनीच पावणे दोन लाखांची सुपारी देऊन मुलाला संपवलं, बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा केला उघड

ह्याचा प्रसार करा

बारामती : प्रतिनिधी

दारू पिऊन सातत्यानं त्रास देणाऱ्या मुलाचा आई-वडिलांनीच सुपारी देऊन खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. बारामती तालुका पोलिसांनी या प्रकरणी संबंधित वृद्धा दांपत्यासह सुपारी घेणाऱ्या तिघांना अटक केली आहे.

पोपट बाराते, मुक्ताबाई बाराते, बबलू पवार, भाऊ गाढवे आणि अक्षय पाडळे अशी या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २६ मे २०२३ रोजी बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील तलावात रस्सी व तारेने बांधलेला एक ३० ते ४० वयोगटातील पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर बारामती तालुका पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या दरम्यान, दौंड तालुक्यातील रावणगाव येथील पोपट भानुदास बाराते, त्यांची पत्नी मुक्ताबाई बाराते आणि मुलगा सौरभ बाराते हे तीन महिन्यांपासून अचानक गायब झाल्याची आणि १५ दिवसांनी बाराते पती-पत्नी परतल्याची माहिती मिळाली.

मुलगा सौरभ हा परतला नसल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यामुळे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी शुक्रवारी दि. ३१ ऑगस्ट रोजी रावणगाव येथे जाऊन पोपट बाराते याच्याकडे चौकशी केली. त्यांचा मुलगा आणि पत्नी कुठे आहे याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मला काहीच माहिती नाही, तुम्ही माझ्या पत्नीलाच विचारा असं उत्तर त्याच्याकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी कर्जत तालुक्यातील खूरंगेवाडी येथे गेलेल्या मुक्ताबाई बाराते यांचा शोध घेतला.

यावेळी मुक्ताबाई बाराते हिने मुलगा सौरभ दारु पिऊन येऊन मारहाण करत असल्याची आणि पती-पत्नीला त्रास देत असल्याची माहिती दिली. अधिक चौकशी केल्यानंतर पती-पत्नीने मिळून रावणगाव येथील बबलू तानाजी पवार याला १ लाख ७५ हजार रुपयांची सुपारी देऊन मुलगा सौरभ याचा खून केल्याची कबुली दिली. बबलू पवार याने बाबासाहेब उर्फ भाऊ गजानन गाढवे आणि अक्षय चंद्रकांत पाडळे या दोघांच्या साथीने सौरभचा खून केल्याचे आणि त्याचा मृतदेह शिर्सुफळ येथील तलावात टाकून दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी या प्रकरणी संबंधित बाराते पती-पत्नीसह अन्य तिघा आरोपींना अटक केली आहे. बारामती तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे, पोलिस उपनिरीक्षक राजेश माळी, सहाय्यक फौजदार कल्याण शिंगाडे, पोलिस हवालदार राम कानगुडे, सुरेश दडस, गोदेश्वर पवार, सदाशिव बंडगर, संतोष मखरे, दत्तात्रय मदने, शशिकांत दळवी, महेश कळसाईत यांच्या पथकाने हा किचकट गुन्हा उघड केला आहे.


ह्याचा प्रसार करा
Exit mobile version