बारामती : प्रतिनिधी
बारामती शहर आणि परिसरातील बेकायदेशीर अकॅडमींवर कारवाई करावी यासाठी अनेकदा आंदोलने, उपोषण करण्यात आले. मात्र प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. उलट या अकॅडमींना संरक्षण देण्याचं काम प्रशासनाकडून होत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी टाकीवर चढून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवार दि. ३ जानेवारी रोजी हे आंदोलन होणार आहे.
बारामती शहर व परिसरात बेकायदेशीर अकॅडमींचे पेव फुटले आहे. विद्यार्थ्यांना आकर्षित करून त्यांच्याकडून लाखो रुपये फी वसूल करण्याचा धंदाच या अकॅडमींकडून केला जात आहे. या विरोधात मोहसीन पठाण यांनी शालेय शिक्षण विभाग, बारामती नगरपरिषद यासह शासनांच्या विविध विभागांकडे तक्रारी केल्या आहेत. तसेच या अकॅडमींकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याचे आणि मोठ्या प्रमाणात कर बुडवला जात असल्याचेही निदर्शनास आणून देण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, या अकॅडमींवर कारवाई व्हावी यासाठी मागील काही दिवसांत अनेकदा उपोषण, धरणे आंदोलने करण्यात आली आहेत. मध्यंतरी झालेल्या उपोषणावेळी बारामतीच्या तहसीलदारांनी बैठक घेऊन कारवाईचे आश्वासन दिले होते. तशा सूचनाही संबंधित प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र आजवर कोणतीच कारवाई झालेली नसल्याचे मोहसीन पठाण यांनी सांगितले.
दुसरीकडे, बारामती नगरपरिषदेने एक-दोन दिवस कारवाईचा दिखावा केला. त्यानंतर मात्र या अकॅडमींना सहकार्य करण्याची भूमिका नगरपरिषद प्रशासनाने घेतली. वेळोवेळी प्रशासनाकडून कारवाईत चालढकल होत आहे. त्याचवेळी आर्थिक हित साधून या अकॅडमींना अभय दिले जात आहे. त्यामुळे बुधवार दि. ३ जानेवारी रोजी बारामती शहरातील तीन हत्ती चौक येथील बारामती नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा टाकीवर चढून आंदोलन करणार असल्याचे मोहसीन पठाण यांनी सांगितले आहे.