बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील ३१ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वर्चस्व कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर बारामतीची जनता कोणाला साथ देते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र निकालानंतर बारामती तालुक्यात अजितदादांचीच चलती असल्याचं पाहायला मिळालं आहे.
बारामती तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी मानाजीनगर ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. तर उर्वरीत ग्रामपंचायतींसाठी काल मतदान पार पडले. आज बारामतीतील प्रशासकीय भवनात सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. मतमोजणीच्या नऊ फेऱ्या पार पडल्या. त्यामध्ये पहिल्या फेरीत पानसरेवाडी,भोंडवेवाडी,आंबी बुद्रुक,गाडीखेल, म्हसोबानगर,पवईमाळ या ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली.
दुसऱ्या फेरीत करंजे, जराडवाडी, सिद्धेश्वर निंबोडी, मगरवाडी, दंडवाडी, कुतवळवाडी या ग्रामपंचायतींची मोजणी करण्यात आली. त्यानंतर तिसऱ्या फेरीत चांदगुडेवाडी, साबळेवाडी, वंजारवाडी, चौधरवाडी, उंडवडी क.प, काळखैरेवाडी या ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली. चौथ्या फेरीमध्ये सायंबाचीवाडी, धुमाळवाडी, करंजेपूल, कऱ्हावागज, कोऱ्हाळे खुर्द, पाचव्या फेरीत मेडद, शिर्सुफळ आणि पारवडी ग्रामपंचायतीची मतमोजणी झाली. पारवडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलचा उमेदवार सरपंचपदी निवडून आला आहे.
त्यानंतरच्या टप्प्यात मुढाळे, सुपे, गुणवडी, डोर्लेवाडी आणि काटेवाडी ग्रामपंचायतीची मतमोजणी झाली. यात सर्वच्या सर्व ठिकाणी अजित पवार यांच्या पॅनलचं वर्चस्व पाहायला मिळालं. एकूणच राष्ट्रवादीतील फुटीनंतर बारामतीत निकाल काय लागणार याबाबत उत्सुकता होती. मात्र बारामतीकर जनतेने पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याच नेतृत्वाला मान्यता देत त्यांच्या विचारांच्या उमेदवारांना निवडून दिले आहे.