बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. त्यामध्ये तब्बल १८ ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले असून या सर्व ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकहाती वर्चस्व स्पष्ट झाले आहे.
बारामती तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी मानाजीनगर ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. तर उर्वरीत ग्रामपंचायतींसाठी काल मतदान पार पडले. आज बारामतीतील प्रशासकीय भवनात सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत हाती आलेल्या निकालात सर्वच ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने वर्चस्व मिळवले आहे.
पहिल्या फेरीत पानसरेवाडी,भोंडवेवाडी,आंबी बुद्रुक,गाडीखेल, म्हसोबानगर,पवईमाळ या ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली. त्यामध्ये सर्व ठिकाणी अजितदादांच्या गटाने सत्ता मिळवली आहे. तर दुसऱ्या फेरीत करंजे, जराडवाडी, सिद्धेश्वर निंबोडी, मगरवाडी, दंडवाडी, कुतवळवाडी याही ग्रामपंचायतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला विजय मिळाला. तिसऱ्या फेरीत चांदगुडेवाडी, साबळेवाडी, वंजारवाडी, चौधरवाडी, उंडवडी क.प, काळखैरेवाडी या ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली. त्यातही अजितदादांचाच बोलबाला पाहायला मिळाला.
एकूणच बारामती तालुक्यात अजितदादांनी एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले असून राष्ट्रवादीतील फुटीनंतरही बारामती तालुक्यात जनतेने अजितदादांनाच पाठिंबा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मतमोजणीच्या नऊ फेऱ्या होणार आहेत. त्यामध्ये तालुक्यातील लक्षवेधी लढत असलेल्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.