बारामती : प्रतिनिधी
बारामती शहरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेचा नीरा डाव्या कालव्यात पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. सरस्वस्ती गुणवंत तोंडारे असे या महिलेचे नाव आहे. मुलीकडे आलेल्या या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती अशी की, सरस्वती तोंडारे या दोन दिवसांपूर्वी बारामती शहरातील ओझर्डे इस्टेट येथे वास्तव्यास असलेल्या त्यांच्या मुलीकडे आल्या होत्या. आज सकाळी त्या शहरातील नीरा डाव्या कालव्यावर मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. त्यावेळी नीरा डाव्या कालव्याच्या भरावावरून त्यांचा पाय घसरला. नीरा डाव्या कालव्यात पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
संबंधित महिलेचे पती हे सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी आहेत. तोंडारे कुटुंबीय सध्या भिगवण येथे वास्तव्यास आहेत. आज सकाळी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे तोंडारे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अधिक तपास बारामती शहर पोलिस करीत आहेत.